दै. #अजिंक्य_भारत वृत्तपत्रात प्रकाशित लेख
धन्यवाद संपादक साहेब, Nilesh Pote, Shivaji Bhosale
व्हाईट स्पेस
देशभक्तीची पेरणी
ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात देशभर साजरा झालेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पुन्हा एकदा देशभक्तीची ज्योत भारतीयांच्या मना मनात चेतवून गेल्याचे चित्र भारतभर दिसून आले. भारताचा स्वातंत्र्यलढा जगात सर्वश्रेष्ठ मानला जातो; त्याला कारणही तसेच आहे. आतापर्यंत भारतापासून अमेरिकेपर्यंत सर्वच देशांनी पारतंत्र्य भोगलेलं आहे. भारत अपवाद यासाठी ठरला की येथील स्वातंत्र्याचा लढा हा ९९ टक्के रक्तपाताशिवाय लढल्या गेला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या सत्य अहिंसेच्या तत्वावर ही स्वातंत्र्याची लढाई लढली गेली. ह्या तत्वामुळेच संपूर्ण भारतीयांच्या मनात देशभक्ती पेरली गेली आणि ही देशभक्तीच इंग्रजांची बलाढ्य सत्ता भारतामधून उलथवून टाकण्यास कारणीभूत ठरली.
असहकार चळवळ, मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, सविनय कायदेभंग चळवळ, भारत छोडो आंदोलन अशी अनेक आंदोलने गाव पातळीपर्यंत त्या काळात आजच्या सारखी प्रचंड प्रमाणात प्रसार माध्यमे नसतांना पोहोचली होती. ह्या आंदोलनांमध्ये प्रत्येक भारतीय आपला खारीचा वाटा उचलत होता. मी देशाचा, हा देश माझा ही भावनाच देश स्वतंत्र करण्यासाठी कारणीभूत ठरली होती. स्वातंत्र्योत्तर काळात व स्वातंत्र्यानंतर च्या दशकात जन्माला आलेल्या भारतीयांमध्ये ही देशभक्ती कायम होती. त्यानंतरच्या काळात स्वातंत्र्याचा उपभोग घेणाऱ्या भारतीयांमध्ये पाहिजे त्याप्रमाणात देशभक्तीची बीजे पेरण्यास उणीव राहिली. देशातील शासन प्रशासन व शिक्षण व्यवस्था मनामनात देशभक्ती कायम ठेवण्यात कमी पडल्याचेच त्यानंतरच्या काळात प्रकर्षाने दिसून आले.
राष्ट्रीय सण, उत्सव वा राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागाबद्दल भारतीयांच्या मनात असणारी उदासीनता प्रकर्षाने जाणवत होती. भारताचं स्वातंत्र्य ७५ वर्षाचं झालं. शासन-प्रशासन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गावागावात, घराघरात स्वातंत्र्याची महती घेऊन पोहोचलं. तिरंगा घरा घरा वर डौलाने फडकू लागला आणि पुन्हा एकदा देशभक्तीची ज्योत मनात गाव खेड्यात पेटवली गेली. देशभक्ती म्हणजे फक्त तिरंगा फडकवणे किंवा राष्ट्रगान गायन करणे नव्हे तर प्रत्येक भारतीयाने आपले कार्य सचोटीने देशासाठी करायला हवे. कोणतेही देश विघातक, भ्रष्टाचारी कृत्य हे देशभक्तीची भावना लयाला नेत असते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने गावोगावी स्वच्छता झाली. स्वच्छतेचा हा मंत्र जरी प्रत्येक भारतीयांनी मनापासून पाळला तर देशाची वाटचाल प्रगतीकडे झाल्याशिवाय राहणार नाही. स्वच्छता आली म्हणजे आरोग्य आले आरोग्य आले म्हणजे सुदृढ भारत होईल. तसेच अनेक संस्था संघटनांनी वृक्षारोपण व संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. यामुळे नक्कीच देशाचा पर्यावरणीय असमतोल दूर केला जाऊ शकतो. ह्या छोट्या छोट्या कामांमधून आपण देशभक्ती प्रदर्शित करू शकतो. आपल्याला नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे करणे हे सुद्धा देशभक्तीचेच प्रतिक आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने का होईना देशभक्तीची भावना मनामनात, घराघरात चेतवल्या गेली हेही नसे थोडके. देशभक्तीची ही व्हाइटस्पेस पुढची पंचवीस वर्षे स्वातंत्र्याच्या शतक महोत्सव येई पर्यंत तरी कायम मनामनात तेवत राहावी ही अपेक्षा प्रत्येक भारतीयांकडून करूया.
--- तुळशिदास खिरोडकार
9970276582