Staff

                    सुभाष पंजाबराव कवटकार स. अ. 

                        🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
                    
          सौ. शीला विनोदराव टेंभरे (प्रभारी मुख्याध्यापिका)
                           शिक्षण- एम .ए. बी. एड

     आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशित करून सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या तेल्हारा तालुक्यातील चंदनपुर येथे एका घरात शाळा भरून शिक्षण क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला. शिक्षण क्षेत्रात आतापर्यंत २८ वर्ष प्रामाणिकपणे विद्यार्थी घडविण्याचे कार्य त्या करत आहेत.१९९७ पासून पदवीधर शिक्षक म्हणून उच्च प्राथमिक शाळांवर इंग्रजी विषय अध्यापनाचे कार्य त्या करीत आहेत.प्रभारी मुख्याध्यापक म्हणून प्रशासन चालवण्याचा ०७वर्षाचा अनुभव त्यांना आहे. २०१८ पासून जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा येथे प्रभारी मुख्याध्यापक पदा सोबतच इंग्रजी विषय अध्यापनाचे कार्य चोखपणे त्या करत आहेत. सहकारी शिक्षकांच्या सहयोगातून शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. पालक व शाळेला एकत्रित आणून विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्या प्रयत्न करत असतात.
====================================


                          श्रीकृष्ण तानुजी वाकोडे
                           शिक्षण - बी. ए. डी. एड

     प्रामाणिकपणे विद्यार्थी हितासाठी अविरत कार्यरत असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून शिक्षणक्षेत्रात
श्री. वाकोडे सर यांची ओळख आहे. वाशीम जिल्ह्यात ०७  वर्ष व अकोला जिल्ह्यात १९ वर्षाची शैक्षणिक सेवा दिली आहे.त्यांचा २६ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव शालेय विकासासाठी महत्वपूर्ण ठरत आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्हावे यासाठी नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा साठीचे विशेष वर्ग ते चालवतात. खंडाळा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालवला जातो. मुलींची १००% पटनोंदणी केल्याबद्दल प्रशासनाने त्यांचा गौरव केला आहे.तसेच खंडाळा येथे केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO ) म्हणून काम पाहतात. 

=====================================


                  श्री.ओमप्रकाश शालिग्राम निमकर्डे
                         शिक्षण - बी. ए. डी. एड

     कृतियुक्त अध्यापनावर भर देत ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार  शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेणारे शिक्षक म्हणून ओमप्रकाश निमकर्डे यांची ओळख आहे. अमरावती, बुलढाणा व अकोला जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेल्या ऐतिहासिक व धार्मिक स्थळ वारी भैरवगड येथून शैक्षणिक सेवा कार्याला त्यांनी सुरुवात केली. या परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्या काळात त्यांनी पालक संपर्क करून १००% पटनोंदणी करत विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवण्यासाठी प्रयत्न केले. आतापर्यंत २४ वर्ष सेवा तेल्हारा तालुक्यातील विविध शाळांवर दिली आहे. खंडाळा येथे यापूर्वी सुद्धा ते कार्यरत होते. यामुळे गावातील पालकांशी त्यांचा जवळचा संबंध असल्याने शालेय विकासात यांची भूमिका फलदायी ठरत आहे.

=====================================


                    तुलसीदास किसनराव खिरोडकार 
                          शिक्षण - एम. ए. डी. एड 

      अकोला जिल्हा परिषदेमध्ये प्रयोगशील प्राथमिक शिक्षक म्हणून तुलसीदास किसनराव खिरोडकार कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्राबरोबरच सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती आहे. लढा स्वातंत्र्याचा (इतिहास कथन) व बालस्नेही (शैक्षणिक) हे आदिवासी कोरकू भाषिक विद्यार्थ्यांना कोरकू - मराठी भाषा ओळख करून देणारे पुस्तक प्रकाशित. शालेय विद्यार्थी व शिक्षकांसाठी संवाद नियतकालिकाचे संपादक म्हणून कार्य. विविध वर्तमानपत्रात लेख, कविता प्रकाशित. राज्यस्तरीय शिक्षक प्रशिक्षणात सुलभक म्हणून कार्य. जागर फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे संयोजक म्हणून विविध सामाजिक उपक्रमात सहभाग. तेल्हारा तालुक्यातील आदिवासी ग्राम करी रुपागड या गावाला दहा लाख रुपयांचा पुरस्कार मिळवून दिला. प्रयोगशील शिक्षक म्हणून विविध वाहिन्यांवर वृत्तांत प्रसारित. 
       कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी रेडिओ खंडाळा या उपक्रमाद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांना अध्ययनाची शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिली. बालरक्षक चळवळीच्या माध्यमातून असंख्य शाळाबाह्य मुलांना शाळेच्या शिक्षण प्रवाहात आणण्याचे कार्य केले.त्यांनी स्थापन केलेल्या ' सेव्ह बचपन ' या संस्थेच्या माध्यमातून निराधार व शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सुरु आहे. खंडाळा येथे शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम करतात. मोहल्ला शाळा उपक्रम, भिंतीवरील लेखन, निसर्गयात्रा उपक्रम अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचे अध्यापनाचे कार्य सुरू असते. तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षणाची प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी करून विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभूती देतात.पालक, विद्यार्थी व शिक्षक यांच्या समन्वयाने व सहकार्याने शाळेचे नाव त्यांनी राज्यभरात प्रसिद्ध केले. जीवन शिक्षण या मासिकामध्ये त्यांचा लेख २०२१ मध्ये प्रकाशित झालेला आहे. ५ सप्टेंबर २०२० रोजी कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्हाभरातील ५० उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान त्यांनी जागर फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून केला. आपल्या २२ वर्षांच्या शासकीय सेवेत त्यांनी प्रत्येक शाळेत आपल्या कामाचा ठसा उमटवला.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्राथमिक शिक्षक गटात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळाला. आदिवासी मित्र, दिव्यांग मित्र, शिक्षक साहित्य पुरस्कार, प्रयोगशील शिक्षक पुरस्कार, गुणवंत शिक्षक पुरस्कार, अकोला भूषण पुरस्कार, उपक्रमशील शिक्षक पुरस्कार  यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अकोला यांचे वतीने 5 सप्टेंबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा विद्यमान आमदार मा. रणजित पाटील साहेब यांच्या हस्ते 'शिक्षक रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फेब्रुवारी २०२१ मध्ये राज्यस्तरीय बालरक्षक पुरस्कार घोषित करण्यात आला. शिवजयंती 2022 निमित्त मानवतेचा सेवा सन्मान पुरस्कार घोषित करण्यात आला. 

====================================
सुभाष पंजाबराव कवटकार 
शिक्षण - एच. एस. सी., डी. एड 
जि. प. शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षक म्हणून 27/11/1996 रोजी रुजू. आतापर्यंत किनखेड पूर्णा, गिरिजापूर, हिंगणी बु., अजनी बु., अडगांव बु. व सध्या जि. प. शाळा खंडाळा येथे कार्यरत आहेत. त्यांनी काही कवितासुद्धा लिहिलेल्या आहेत. 

=================================



सौ. सुरेखा ब्रम्हदेव हागे
शिक्षण - एम. ए. डी.एड 

शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे,प्रत्येक मूल शिकायलाच पाहिजे हा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा विचार अंगीकृत करून प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या शिक्षिका म्हणून सौ. सुरेखा हागे यांची ओळख आहे. तेल्हारा तालुक्यातील विविध शाळांवर आतापर्यंत १८ वर्षे सेवा त्यांनी दिली आहे. खंडाळा शाळेतील राजू मीना मंच, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यार्थिनी संघाच्या संयोजक म्हणून त्या काम पाहतात. कृतियुक्त अध्यापन तंत्र वापरून प्रत्येक विषयाचे संबोध दृढ करण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती साठी त्या प्रयत्नरत असतात. IISER - Indian Institutes of science Education & Research Pune .
(भारतीय अनुसंधान आणि वैज्ञानिक शिक्षण व संशोधन केंद्र पुणे) येथे चौथी राज्यस्तरीय विज्ञान आणि गणित शिक्षक परिषद 2019 ला उपस्थित राहून शोध निबंध त्यांनी सादर केला तसेच डॉ. होमी भाभा अनुसंधान व संशोधन केंद्र मुंबई येथे नोव्हेंबर 2019 ला मराठी विज्ञान परिषदेच्या शैक्षणिक उपक्रम अंतर्गत विद्यार्थी प्रकल्प सादरीकरण केले आहे. रेडिओ खंडाळा वाहिनी वर मराठी,गणित व भूमिती विषयाचे विशेष पाठ्यक्रम आधारित कार्यक्रम त्यांचे प्रसारित झाले आहेत. त्यांचा मार्गदर्शनात २०२० साली इन्स्पायर अवार्ड साठी कु. ईश्वरी गजानन गोलाईत वर्ग सातवी ह्या विद्यार्थिनीच्या विज्ञान प्रतिकृती ची निवड झाली आहे.नागपूर आकाशवाणी वरुन प्रसारित शाळेबाहेरची शाळा ह्या विशेष कार्यक्रमात त्यांच्या तिसऱ्या वर्गातील प्रज्वल महेश जाधव ह्या विद्यार्थ्याने व त्याच्या आईने सहभाग घेतला आहे.कोरोना काळात विविध प्रकारे ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवत विद्यार्थी शिक्षक आंतरक्रिया सुरु ठेवल्याबद्दल ५ सप्टेंबर २०२० ला शिक्षक दिनी जागर फाउंडेशनच्या वतीने उपक्रमशील शिक्षिका म्हणून सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव झाला आहे. प्रामाणिकपणे अध्यापन कार्य करत शालेय गुणवत्ता विकास करण्यासाठी त्या नेहमीच तत्पर असतात.तसेच महात्मा फुले समता परिषद अकोला यांच्या वतीने "सावित्रीची लेक" पुरस्काराने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी 2022 रोजी सन्मानित करण्यात आले. 

===================================

राजेंद्र दयाराम दिवनाले
शिक्षण - एम.ए. बी.एड

तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोचवण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे शिक्षक म्हणून राजेंद्र दिवनाले यांची ओळख आहे. सतरा वर्ष शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे त्यांनी सेवाकार्य केले आहे. सेवेच्या सुरुवातीच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात नऊ वर्षे सेवा त्यांनी दिली. जिल्हा बदली नंतर मूळ अकोला जिल्ह्यातील खंडाळा या जन्मगावी,प्राथमिक शिक्षण ज्या शाळेत झाले त्या शाळेतच शिक्षक म्हणून अदयापपर्यंत रुजू आहेत व गावाची शैक्षणिक सेवा करण्याची ही संधी ते मनोभावे जपत आहेत.गावातील प्रत्येक मूल शैक्षणिक समृद्ध व्हावे यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून अध्यापन करीत असतात.इयत्ता ५ते ७ ला गणित विषयासह इतर विषय ते शिकवतात. शाळा व गावकरी यांच्यात सकारात्मक समन्वय निर्माण करण्याचे कार्य ते करीत असतात. उत्तम प्रकारे अध्यापन कार्य करीत असतांनाच स्वतः अध्ययनरत राहून त्यांनी स्वतःची शैक्षणिक अहर्ता वाढवत एम. ए. बी. एड. केले आहे. त्यांच्या उच्च शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी होत आहे.

====================================


निखिल सुरेशराव गिऱ्हे
शिक्षण - बी.ए.बी.एड

सामर्थ्यवान राष्ट्र निर्माण करण्यासाठी दर्जेदार शिक्षण घराघरात पोहचविण्याचे व्रत स्नेहपूर्वक जपत शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिकपणे वावरणारे युवा शिक्षक म्हणून निखिल गिऱ्हे सर हे समाजात परिचित आहेत.शिक्षण सेवाकार्याची १२ वर्षे उत्साहात व उल्लेखनीय रित्या त्यांनी पूर्ण केली.स्पर्धा परीक्षा मधे ग्रामीण विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा ह्या हेतूने प्राथमिक स्तरावर प्रत्येक संबोध कृतियुक्त व कथारूपात मांडून बाल पिढ्या घडविण्याचे कार्य ते आनंदाने करीत आहेत.आता पर्यंत त्यांचे अनेक विद्यार्थी नवोदय परीक्षा उत्तीर्ण होऊन जवाहर नवोदय विद्यालयात अध्ययन करीत आहेत. विद्यार्थ्यांचे मन व शरीर निरोगी असले की त्याची ज्ञान ग्रहण क्षमता वाढते म्हणून पुस्तकी शिक्षणासोबतच खेळ,क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम,पर्यटन इत्यादी क्षेत्राची आवड विद्यार्थ्यांमधे निर्माण करण्यासाठी त्यांचा पुढाकार राहिला आहे. खंडाळा येथे क्रीडा संकुल निर्मिती व कार्यान्वित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. काळानुरूप अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन टेस्ट, स्वाध्यायमाला निर्मिती, शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती तसेच रेडिओ खंडाळा वाहिनीवर विविध शैक्षणिक कार्यक्रमाचे सादरीकरण त्यांनी केले आहे.सोबतच मृदभाषी, वेळेचे महत्व जाणणारे,सहकार्य प्रिय, प्रामाणिक, कर्तबगार नि पाठय विषयाच्या विकासासंबंधी व विद्यार्थी हितासाठी प्रयत्नशील असणे असे उत्तम शिक्षकाचे सर्व गुण त्यांच्यात आहेत. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची मोहल्ला शाळा भरवून गावातील भिंती पाठयांशाने रंगवून त्यांनी विद्यार्थी शिक्षणरत ठेवला. शाळेचा गुणवत्ता आलेख त्यांच्या विद्यार्थी विकासाच्या विचारसरणीने चढता राहत आहे ही भूषणावह बाब आहे. कोरोना काळात शिक्षण प्रक्रिया गतिमान ठेवल्याबद्दल ५ सप्टेंबर २०२१ ला शिक्षक दिनी जागर फाउंडेशनचा उपक्रमशील शिक्षक म्हणून सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव झाला आहे.

====================================


गोपाल बाळकृष्‍ण मोहे 
शिक्षण - एम. ए. डी.एड 

भूतलावरील प्रत्येक मेंदू शिकू शकतो हा विश्वास मनात कायम स्मरणात ठेवून व परिघातील सर्वांच्या मनात रुजवत आनंददायी पद्धतीने विविध तंत्र व तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक संबोध दृढ करणारे शिक्षक म्हणून गोपाल बाळकृष्ण मोहे सर्वदूर परिचित आहेत.आतापर्यंत त्यांची १४ वर्षे सेवा झाली आहे.शांत,विनयशील व सचोटीने प्रत्येक कार्य ते करीत असतात.शालेय परिघात व सार्वजनिक आयुष्यात प्रत्येक विदयार्थी,पालक व सहकारी यांना ते क्षणोक्षणी सन्मान व प्रेरणा देत जगतात. त्यांच्या आपुलकीच्या जगण्यामुळे ते शाळेतील विदयार्थी प्रिय शिक्षक बनले आहेत. अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञान वापरून खंडाळा शाळेतील शैक्षणिक प्रक्रिया त्यांच्यामुळे गतिमान झाली आहे.शैक्षणिक साहित्याचा अध्यापनात उपयोग करून कृतिशील व प्रयोगशील शिक्षणावर त्यांचा भर असतो.ऑनलाईन टेस्ट, प्रमाणपत्र टेस्ट, स्वाध्यायमाला, पाठ्यक्रमावर आधारित व्हिडीओ निर्मिती त्यांनी केली आहे. रेडिओ खंडाळा वाहिनीवर त्यांच्या विज्ञान विषयक कार्यक्रमाचे प्रसारण सुद्धा झाले आहे.शाळेचा ब्लॉग तयार करण्यास त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खंडाळाची वाटचाल शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांपर्यंत पोहचत आहे. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची मोहल्ला शाळा भरवून गावातील भिंती पाठयांशाने रंगवून त्यांनी विद्यार्थी शिक्षणरत ठेवला.शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करत असल्याबद्दल स्मृतीशेष रामकृष्ण आप्पा मिटकरी प्रतिष्ठान चा सन्मानाचा ज्योती सावित्री शिक्षक रत्न पुरस्कार अकोला जि. प चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सौरभ कटियार यांच्या हस्ते व आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन तर कोरोना काळात शिक्षण प्रक्रिया गतिमान ठेवल्याबद्दल जागर फाउंडेशनचा उपक्रमशील शिक्षक म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव झाला आहे. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खंडाळा ची समाजमनात दर्जेदार शिक्षण देणारी संस्था अशी ओळख करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
===================================


No comments:

Post a Comment

नवोदय परीक्षा पूर्वतयारी वर्ग

 *नवोदय वि‌द्यालय प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारी वर्गाचे उ‌द्घाटन*  हिवरखेड (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी,...