Sunday, September 25, 2022

व्हाईट स्पेस - डॉ. शंकरबाबा पापळकर

 व्हाईट स्पेस

धन्यवाद दै. अजिंक्य भारत

भाऊसाहेब Nilesh Pote, Shivaji Bhosale 

सव्वाशे लेकरांचा बाप - डॉ. शंकरबाबा पापळकर 

महाराष्ट्र भूमीत साधू, संत, समाजसेवकांची विचारधारा जगणारी सजीव हृदयाची अनेक माणसं दिसतात. प्रत्येक श्वासागणिक जे समाजाच्या हिताचं असा विचार करणारे 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगेबाबा यांच्यानंतर ज्यांच्या जगण्याची पूजा करावीशी वाटते, ज्यांच्या चरणावर डोकं ठेवावं वाटते अशा सव्वाशे अनाथ, दिव्यांग, मतिमंद लेकरांचा माय बाप दोन्ही असलेल्या देव माणसाची ही गोष्ट. 

दिसे बिचारा साधाभोळा l

परी हृदयी कार्याचा जिव्हाळा l

हवा - हवाच वाटे सकळा l सेवागुणे ll 

ह्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीता ग्रंथातील ओळी.

बाली, शैलजा, मुमताज झेबून्नीसा, महंमद, रोझी, रूपा, सोनाली, सलमा, गांधारी, आरती, विदुर अशा सव्वाशे अनाथ, दिव्यांग, मतिमंद लेकरांना मायेचा आधार दिलेल्या नि शासनाच्या दफ्तरी आधार कार्डवर बाप म्हणून नोंद असलेल्या डॉ.शंकरबाबा पापळकर ह्या बाप देव माणसाला भेटलो तेव्हा आपसूकच ओठांवर आल्या.

महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात परतवाडा शहराजवळ सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वझ्झर हे छोटं गाव आहे. गावाबाहेर असलेल्या टेकडीवर सव्वाशे दिव्यांग अनाथ लेकरांचं हे कुटुंब घेऊन शंकरबाबा पापळकर हा देवमाणूस वास्तव्य करतो. त्यांच्या सानिध्यात ह्या सव्वाशे लेकरांच्या काळ्या कोमेजलेल्या आयुष्याला जगण्याची हिरवाई प्राप्त झाल्याचं आपल्या नजरेस पडते. मृतप्राय झालेल्या जीवांच्या स्पंदनात प्राण फुंकल्याचं जाणवते. जशी ही लेकरं मृत जीवन जगत होती तशीच ही गावाबाहेरची टेकडी ओसाड, उजाड होती.  ह्या टेकड्या सुद्धा दिव्यांग लेकरांच्या सहकार्याने बाबांनी हिरव्यागार केल्याचे दिसून येते. टेकडीवर राहणाऱ्या सव्वाशे लेकरांना स्वतःचे जन्मदाते माय बाप माहिती नाहीत. त्यांना ठाऊक आहे फक्त मायेच्या स्पर्शाने हक्काचं घर देणारा शंकरबाबा जो ह्या लेकरांचा माय अन बाप बनून कुटुंबाचा आधार बनला आहे. कुणी दिव्यांग आहे म्हणून तर कुणी अनौरस जन्माला आले म्हणून कचरा कुंडीत, रेल्वे फलाटावर, नदी काठावर तर कुणी संडासात निर्दयीपणे टाकून दिलेली ही लेकरं शंकरबाबांनी हृदयस्थ केली. माया, प्रेम, ममतेने त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली, समाजाकडून आधार शिक्षण, आरोग्य सुविधा मिळवत ह्या लेकरांना पायावर उभं करत अनेकांची लग्न करून देत संसार उभे केले.

कर्मयोगी गाडगेबाबा यांचा वारसा चालवणारे शंकरबाबा, ओशो रजनीश यांच्या विचारधनाने प्रेरित होऊन तब्बल वीस वर्षापासून बेवारस, दिव्यांग लेकरांच्या जगण्याचा आधार बनलेले आहेत. सद्विचारी लोकांच्या योगदानातून बाबा हे सव्वाशे लेकरांचं कुटुंब आंनदात चालवत आहेत. बाबांचे कार्य पाहून जागतिक कीर्तीची अनेक व्यक्तिमत्व प्रभावीत झाली आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठाने त्यांच्या आभाळ उंचीच्या समाजसेवेचा गौरव म्हणून त्यांना डी.लिट.मानद उपाधी देऊन सन्मानित केले आहे. समाजानेच दूर लोटलेल्या सव्वाशे लेकरांची नवी ओळख समाजाला करून देणारे शंकरबाबा भारतातील एकमेव व्यक्ती आहेत; ज्यांचे नाव आधारकार्ड वर बाप म्हणून छापले गेले आहे.

गांधारी ही जन्मत: दिव्यांग तिच्या पालकांनी पंढरपूरच्या गोदावरी तिरावर तिला टाकून दिले होते. बेवारस म्हणून पोलिसांनी तिला नवरंगी बालगृहात पालन पोषणासाठी ठेवले. सहा वर्षाची असतांना ती बाबांच्या स्व. अंबादासपंत वैदय मतिमंद बाल सुधारगृहात वझ्झरला आली. हीच चिमुकली आता गांधारी शंकरबाबा पापळकर ह्या नावाने व आपल्या सुमधुर आवाजाने गायिका म्हणून परिचित झाली आहे.  आतापर्यंत तिने संगीताच्या सात परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. आपल्या लेकरांमधील उपजत कौशल्याला आकार देण्यासाठी वाट्टेल ते कष्ट करत प्रत्येक लेकराला नवी ओळख शंकरबाबांनी मिळवून दिली आहे. गांधारी सारखीच कथा असणारी ही सव्वाशे लेकरं ज्यांचं मृतपाय जगणं शंकर बाबांनी जिवंत केले आहे.

वझ्झर येथील खडकाळ पंचवीस एकराच्या टेकडीवरच्या आश्रमात मानवी समाजाला सन्मार्ग, सत्कार्य, सचोटी नि सामाजिक जाणीवेची प्रेरणा देणाऱ्या महात्मा जोतिराव फुले यांच्यापासून भारतरत्न मदर टेरेसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा ह्यांच्या सारख्या शेकडो महामानवाच्या नावाचे मार्ग फलक तयार केल्याचे दिसून येतात. ह्या विभूतीच्या आयुष्याचा जीवनप्रवास सुद्धा असाच खाच खडग्याचा होता; तरी त्यांनी मानव कल्याणासाठी कष्ट करून मानवी जीवन समृद्ध करून नंदनवन फुलवले ह्याची प्रचिती येथील मार्गांवरून चालताना पावलोपावली होते. अनेक सेवाभावी संस्था, व्यक्ती ह्या मानवतेच्या यज्ञात शक्य तशी सेवेची आहुती टाकत असतात; परंतु माझ्या नंतर ह्या लेकरांचे कसे होणार ह्याची चिंता ऐंशी वर्षाच्या शंकरबाबांची झोप उडवत असते. शासन निर्णयानुसार बालसुधारगृहात दिव्यांग, अनाथ लेकरं प्रौढ झाल्यानंतर राहू शकत नाहीत. त्यांचे जीवन पुन्हा बेवारस होऊन जाते म्हणून शासनाने कायदा करून बालगृहातील लेकरांचे पुनर्वसन करून जिवंत असेपर्यंत संगोपन करण्याची तरतूद करावी यासाठी वझ्झर ते दिल्ली असा संघर्ष शंकरबाबा करीत आहेत. देशातील १८ वर्षावरील बेवारस आणि दिव्यांगांना मरेपर्यंत अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा झाला पाहिजे. ह्या लढाईला माझ्या शेवटच्या श्वासापूर्वी तरी यश यावे ही त्यांची कणव ऐकून मन गहिवरून जाते. अशा लेकरांच्या जगण्याला मी गेल्यानंतर कायदाच आधार ठरू शकतो. ही त्यांची आर्त हाक भारत सरकारने सुद्धा ऐकली आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळात १८ वर्षावरील देशातील अशा लेकरांना कायद्याचा आधार मिळाला तर त्यांचे जीवनही अमृतमय होऊ शकते.

शंकरबाबा फक्त अनाथ, दिव्यांग लेकरांचाच बाप नाही तर उजाड माळरानावर विविध प्रजातींची वृक्षवल्ली फुलवून तेथे येणाऱ्या पक्ष्यांचा किलबीलाट कानावर पडला की, लाखो सजीवांचा पालनहार असल्याची अनुभूती येते. विविध प्रजातीच्या हजारो वनस्पतींचे संगोपन ह्या माळरानावर आपल्या सव्वाशे लेकरांच्या सहकार्याने शंकर बाबांनी केले आहे. मनातले सर्व प्रश्न विचारा असं म्हणत सुरू झालेल्या ह्या महामानवा सोबतच्या गप्पा म्हणजे आयुष्याच्या शाळेतील जीवन शिक्षण ह्या विषयाची तासिकाच असते. डॉ. शंकरबाबा पापळकर ह्या मानवतेची मनामनात रुजूवात करणाऱ्या देवमाणसाला जो कोणी भेटेल त्याच्या आयुष्यात सामाजिक जाणीवेतून जगण्याची प्रेरणाज्योत नक्कीच पेटती राहते.

-- तुळशिदास खिरोडकार

9970276582



Thursday, September 8, 2022

डॉ. सुचिता पाटेकर यांची खंडाळा शाळेत भेट

   आदरणीय शिक्षणाधिकारी (माध्य ) डॉ. सुचिता पाटेकर  यांनी आज जिल्हा परिषद खंडाळा शाळेत भेट देऊन शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध शालेय सहशालेय उपक्रमांची माहिती जाणून घेतली. आदरणीय शिक्षणाधिकारी यांचा शाळेतील वावर सर्व विद्यार्थी व सहकारी शिक्षक यांना कायम स्मरणीय राहील असा होता.

1) इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांसोबत जॉली फोनिक इंग्रजी अध्यापन तंत्राबाबत संवाद साधला.

2) पाचवीच्या वर्गात सामाजिक शास्त्राची तासिका घेतली.

3) स्वच्छ सुंदर शालेय परिसर पाहून त्यांनी प्रसन्नता व्यक्त केली. स्वच्छ शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक केले.

 4) शाळेच्या ब्लॉगचे, विविध उपक्रम व शैक्षणिक प्रगतीचे अवलोकन केले.

5) परिसरातील आदिवासी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश  करून शिक्षण प्रवाहात कायम टिकवल्याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. 





       शिक्षणाधिकारी मॅडम यांचा इयत्ता पाचवीमध्ये तास 

                                 Click Here

नवोदय परीक्षा पूर्वतयारी वर्ग

 *नवोदय वि‌द्यालय प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारी वर्गाचे उ‌द्घाटन*  हिवरखेड (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी,...