Monday, January 13, 2025

 


🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

                          सन 2024 - 2025

 *मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा 2 या स्पर्धेत जि.प.व.प्राथमिक मराठी केंद्रशाळा खंडाळा तालुक्यातून प्रथम.*

*3 लक्ष रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर*

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

महाराष्ट्र शासनाचा उपक्रम माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा 2 या स्पर्धेत तेल्हारा तालुक्यातून जि.प.व.प्राथमिक मराठी केंद्रशाळा,खंडाळा ने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र व रोख पारितोषिक 3 लक्ष रुपये असे आहे.

मार्गदर्शक - मा. दिनेश दुतंडे गटशिक्षणाधिकारी पं. स. तेल्हारा 


                मा. गोपाल मोहे केंद्रप्रमुख खंडाळा 


कार्यरत शिक्षक : सौ. शीला विनोदराव टेंभरे मुख्याध्यापक 


                      श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे 


                      तुलसीदास खिरोडकार, सौ. सुरेखा हागे 


                       राजेंद्र दिवनाले, गोपाल मोहे 


                       निखिल गिऱ्हे, सुभाष कवटकार 


       निकाल pdf  Click Here

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Sunday, January 12, 2025


 

*तालुकास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धेत जि.प.प्राथ.शाळा,खंडाळा चा तालुक्यातून #व्हॉलीबॉल या खेळामध्ये मुलींचा प्रथम क्रमांक.*
#बॅडमिंटन सूरज प्रशांत आंबुसकर प्रथम क्रमांक 
#बुद्धिबळ कु. श्रेया महेंद्र तायडे द्वितीय क्रमांक 
🥇🥇🥇🏆🏆🏆🏆🥇🥇🥇
*यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री.दिनेश दुतंडे साहेब,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.महेंद्रभाऊ तायडे,श्री.दीपक दही सर,श्री.अविनाश देशमुख सर,श्री.दिलीप भोपळे सर,श्री.राजेश देशमुख सर, श्री.विशाल घोगले सर यांनी केंद्रप्रमुख श्री.गोपाल मोहे सर, मुख्याध्यापिका सौ.शीलाताई टेंभरे मॅडम,सौ.सुरेखा हागे मॅडम,श्री.श्रीकृष्ण वाकोडे सर,श्री तुळसीदास खिरोडकार सर, श्री.राजेंद्र दिवनाले सर,श्री. निखिल गिऱ्हे सर,श्री.सुभाष कवटकार व सर्व विजयी विद्यार्थिनींचे कौतुक केले.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


Wednesday, September 11, 2024

नवोदय परीक्षा पूर्वतयारी वर्ग

 *नवोदय वि‌द्यालय प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारी वर्गाचे उ‌द्घाटन* 


हिवरखेड (प्रतिनिधी)


जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार व शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. सुचिता पाटेकर यांच्या मार्गदर्शनात सहदेवराव भोपळे विद्यालयात नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारी प्रशिक्षण वर्गास दि. ८ सप्टेंबर २०२४ रविवार रोजी सुरवात करण्यात आली. या प्रशिक्षण वर्गाचे उ‌द्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे तर उद्घाटक तेल्हारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दिनेश दुतंडे हे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत अडगाव केंद्राचे प्रमुख किशोर कोल्हे, गोपाल मोहे, केंद्रप्रमुख खंडाळा, प्रमोद पोके, केंद्रप्रमुख हिवरखेड, प्राचार्य संतोषकुमार राऊत, है होते. पूर्वतयारी वर्गाच्या यशस्वीतेसाठी तज्ञ मार्गदर्शक विशाल घोगले यांच्या मार्गदर्शनात विषयं तज्ञ शिक्षक निखील गिन्हे, पोर्णिमा शर्मा, विजया खंडारे, शशिकांत दही, स्वाती बोडखे यांच्यासह तीनही केंद्रातील विषय शिक्षक-शिक्षिका विद्यार्थीहिताय परिश्रम घेणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन विलास घुंगड तर आभार प्रदर्शन गणेश भोपळे यांनी केले. या प्रशिक्षण वर्गास जिल्हा परिषद, अनुदानित मराठी माध्यमिक शाळांचे एकूण ७९ विद्यार्थी पालकांसह उपस्थित होते. परिसरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी सदर प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी दिनेश दुतंडे यांनी केले. या प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अल्पोपहाराची सोय सहदेवराव भोपळे वि‌द्यालय व स्थानिक सेवाभावी संस्था करणार आहेत, असे संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे यांनी सांगितले.












Sunday, April 21, 2024

चुनाव पाठशाला

 मतदान जनजागृतीसाठी खंडाळा येथे 1 एप्रिल 2024 रोजी चुनाव पाठशाळेचे आयोजन करण्यात आले. 





 


                खंडाळा येथे शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न 

    जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा, पंचायत समिती तेल्हारा येथे शाळापूर्व तयारी पहिला मेळावा 19 एप्रिल 2024 रोजी घेण्यात आला. शाळापूर्व तयारी मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनकर धूळ यांच्या हस्ते व सदस्य शैला खंडेराव, सारिका अवचार, केंद्रप्रमुख शीला टेंभरे, महेंद्र तायडे, किशोर खंडेराव, प्रियंका दीपक पाटोळे, शारदा कपिल शर्मा, अंगणवाडी सेविका वैशाली अरुण तायडे, मदतनीस निर्जला अवचार, वनमाला गोलाईत व पालक यांच्या उपस्थितीमध्ये फीत कापून करण्यात आले. 

       यावेळी एकूण सात स्टॉल लावण्यात आलेले होते. यामध्ये नोंदणी, शारीरिक विकास, भावनिक व सामाजिक विकास, बौद्धिक विकास, भाषिक विकास, गणनपूर्व तयारी व समुपदेशन यांचा समावेश होता. या सात ठिकाणी विद्यार्थ्यांच्या क्षमता तपासणी करून त्यांना अध्ययन अनुभव देण्यात आले. यावेळी इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळापूर्व तयारी  मेळावा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शीला विनोद टेंभरे, श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, सुभाष कवटकार, सुरेखा ब्रम्हदेव हागे, राजेंद्र दिवनाले, गोपाल मोहे, निखिल गिऱ्हे व शालेय मंत्रिमंडळ सदस्यांनी प्रयत्न केले.

                 व्हिडीओ पहा  Click Here

Sunday, March 3, 2024

इन्स्पायर अवार्ड 2023-2024

Inspire Award 2023 - 2024

  Inspire Award 2023 - 24 अंतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा येथील प्रतिकृतीची निवड. 

     तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा येथील इयत्ता सहावी मधील प्रज्वल महेश जाधव या विद्यार्थ्याने बनवलेल्या 'मल्टीपर्पज फर्टीलायझर पंप' या प्रतिकृतीची निवड करण्यात आली. पिकांच्या वाढीच्या अवस्थेत पिकांना खत देताना ते पानांवर पडते. त्यामुळे पिकांचे नुकसान होते. यासाठी बहुउपयोगी असलेले मल्टीपर्पज फर्टीलायझर पंप हे यंत्र वापरल्यामुळे पिकाच्या मुळाशी खत पडते. त्यामुळे पिकांचे नुकसान होत नाही.  सदर यंत्र बनवण्यासाठी खर्चही एकदम कमी येतो. शेतकऱ्यांच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामधूनच सदर यंत्र सहज तयार करता येते.

              प्रज्वल महेश जाधव या विद्यार्थ्याने बनवलेल्या प्रतिकृती निर्मितीसाठी विज्ञान शिक्षक गोपाल मोहे व सौ. सुरेखा ब्रम्हदेव हागे यांनी मार्गदर्शन केले. इन्स्पायर अवार्ड मिळाल्याबद्दल केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक सौ. शीला विनोदराव टेंभरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनकर धुळ, उपाध्यक्ष नरेश पिलांत्रे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सहायक शिक्षक श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, तुलसीदास खिरोडकार, राजेंद्र दिवनाले, निखिल गिऱ्हे व सुभाष कवटकार यांनी कौतुक केले. तेल्हारा तालुक्यातील यावर्षी एकूण चार प्रतिकृतींची निवड इन्स्पायर अवार्ड करिता करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषद केंद्र शाळा खंडाळा जिल्हा परिषदेची एकमेव शाळा आहे.





Monday, January 15, 2024

जिल्हास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धा 2024

 *जिल्हास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धेत जि.प.प्राथ.मराठी शाळा,खंडाळा चा सन्मान*

     शालेय खेळ व क्रीडा स्पर्धेत तालुकास्तरावर कबड्डी,लंगडी,धावण्याची शर्यत,लांबउडी,उंचउडी, टेनीक्वाइट,बॅडमिंटन,कॅरम,बुद्धिबळ,योगासने व गोळाफेक या खेळात प्रदर्शन करीत टीम ऑफ टूर्नामेंट या किताबाचे  मानकरी ठरलेल्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा ने जिल्हास्तरावर सुद्धा घवघवीत यश संपादन केले. जिल्हास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धेत कबड्डी या सांघिक खेळासह बुद्धिबळ,टेनिक्वाइट व कॅरम या वैयक्तिक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्राप्त केले. टेनिक्वाइट या खेळामध्ये शुभाशीष दिनेश खंडेराव,कॅरम या खेळामध्ये कु.आनंदी दिनेश पिलांत्रे व बुद्धिबळ या खेळामध्ये सार्थक प्रमोद घुये यांनी आपली चुणूक दाखविली.विद्यार्थी व शाळेच्या यशाचा सन्मान  जि.प अध्यक्ष संगीताताई अढाऊ,शिक्षण सभापती मायाताई नाईक,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.विनय ठमके  ,शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी केला.तेल्हारा पं.स उपसभापती किशोर मुंदडा,गटशिक्षणाधिकारी दिनेश दूतंडे यांचे मार्गदर्शनात केंद्रप्रमुख गजानन गायगोळ,मुख्याध्यापिका शीलाताई टेंभरे,श्रीकृष्ण वाकोडे,ओमप्रकाश निमकर्डे, तुलसीदास खिरोडकार,सुरेखा हागे, राजेंद्र दिवनाले,गोपाल मोहे,निखिल गिऱ्हे व सुभाष कवटकार यांनी या खेळात पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला.या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनकर धूळ,उपाध्यक्ष नरेश पिलांत्रे व गावकऱ्यांनी कौतुक केले.





Thursday, January 12, 2023

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी

              तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी 

                 11 व 12 डिसेंबर 2024




   दि. 27 व 28 डिसेंबर 2023 रोजी स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ तेल्हारा येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये जिल्हा परिषद केंद्र शाळा खंडाळा येथील फळ तोडणी यंत्र या प्रतिकृतीस तिसरा क्रमांक मिळाला. 

सहभागी विद्यार्थी - प्रज्वल महेश जाधव    वर्ग 6 वा 

                           सार्थक संतोष पिलांत्रे  वर्ग 6 वा 






         मा. डॉ. सुचिता पाटेकर मॅडम शिक्षणाधिकारी जि. प. अकोला 

            ===================================

दि. 06 व 07 जानेवारी 2023 रोजी संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा येथील विदयार्थ्यांनी शैक्षणिक खेळ ही प्रतिकृती सादर केली. शाळेमधील शुभाशिष दिनेश खंडेराव व करण देवानंद पाटोळे या विद्यार्थ्यांनी प्रतिकृतीचे उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सोबतच सहायक शिक्षक गोपाल मोहे यांनी सादर केलेल्या 'माझी शाळा माझी दिनदर्शिका' या प्रतिकृतीला प्राथमिक शिक्षक गटातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या प्रतिकृतीची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली. 

          शाळेत मुख्याध्यापिका सौ. शीलाताई टेंभरे, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले. 




        

Friday, December 30, 2022

                           🌷🌷 हार्दिक अभिनंदन 🌷🌷




       दि. 28 व 29 डिसेंबर 2022 रोजी तालुकास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धा तालुका क्रीडा संकुल तेल्हारा येथे संपन्न झाल्या.

      यामध्ये जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा या शाळेने सांघिक क्रीडा प्रकारात सीनियर मुली हॉलीबॉल प्रथम क्रमांक व जर मुले लगडी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच वैयक्तिक स्पर्धांमध्ये 200 मीटर टप्पा, दोरीवरील उड्या, कुस्ती यामध्ये यश संपादन केले.

     तालुका क्रीडा संकुल तेल्हारा येथे बक्षीस वितरण समारंभात तेल्हारा पंचायत समिती सभापती मा. आम्रपालीताई सुमेधभाऊ गवारगुरू,  पं. स. गटनेते मा. संजयभाऊ हिवराळे, पं. स. सदस्य मा. मोबीन गुरुजी, मा. अरविंदभाऊ उमाळे, मा. जयश्रीताई लांडे, मा. अनिताताई पवार, पो. उ. नि. मा. धामोडे साहेब, मा. सुमेधभाऊ गवारगुरू, मा. आदिल भाई, मा. गजाननराव पवार, गटशिक्षणाधिकारी मा. दिनेश दुतंडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 

       सर्व सहभागी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन 🌷🌷

 

Sunday, September 25, 2022

व्हाईट स्पेस - डॉ. शंकरबाबा पापळकर

 व्हाईट स्पेस

धन्यवाद दै. अजिंक्य भारत

भाऊसाहेब Nilesh Pote, Shivaji Bhosale 

सव्वाशे लेकरांचा बाप - डॉ. शंकरबाबा पापळकर 

महाराष्ट्र भूमीत साधू, संत, समाजसेवकांची विचारधारा जगणारी सजीव हृदयाची अनेक माणसं दिसतात. प्रत्येक श्वासागणिक जे समाजाच्या हिताचं असा विचार करणारे 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगेबाबा यांच्यानंतर ज्यांच्या जगण्याची पूजा करावीशी वाटते, ज्यांच्या चरणावर डोकं ठेवावं वाटते अशा सव्वाशे अनाथ, दिव्यांग, मतिमंद लेकरांचा माय बाप दोन्ही असलेल्या देव माणसाची ही गोष्ट. 

दिसे बिचारा साधाभोळा l

परी हृदयी कार्याचा जिव्हाळा l

हवा - हवाच वाटे सकळा l सेवागुणे ll 

ह्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीता ग्रंथातील ओळी.

बाली, शैलजा, मुमताज झेबून्नीसा, महंमद, रोझी, रूपा, सोनाली, सलमा, गांधारी, आरती, विदुर अशा सव्वाशे अनाथ, दिव्यांग, मतिमंद लेकरांना मायेचा आधार दिलेल्या नि शासनाच्या दफ्तरी आधार कार्डवर बाप म्हणून नोंद असलेल्या डॉ.शंकरबाबा पापळकर ह्या बाप देव माणसाला भेटलो तेव्हा आपसूकच ओठांवर आल्या.

महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात परतवाडा शहराजवळ सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वझ्झर हे छोटं गाव आहे. गावाबाहेर असलेल्या टेकडीवर सव्वाशे दिव्यांग अनाथ लेकरांचं हे कुटुंब घेऊन शंकरबाबा पापळकर हा देवमाणूस वास्तव्य करतो. त्यांच्या सानिध्यात ह्या सव्वाशे लेकरांच्या काळ्या कोमेजलेल्या आयुष्याला जगण्याची हिरवाई प्राप्त झाल्याचं आपल्या नजरेस पडते. मृतप्राय झालेल्या जीवांच्या स्पंदनात प्राण फुंकल्याचं जाणवते. जशी ही लेकरं मृत जीवन जगत होती तशीच ही गावाबाहेरची टेकडी ओसाड, उजाड होती.  ह्या टेकड्या सुद्धा दिव्यांग लेकरांच्या सहकार्याने बाबांनी हिरव्यागार केल्याचे दिसून येते. टेकडीवर राहणाऱ्या सव्वाशे लेकरांना स्वतःचे जन्मदाते माय बाप माहिती नाहीत. त्यांना ठाऊक आहे फक्त मायेच्या स्पर्शाने हक्काचं घर देणारा शंकरबाबा जो ह्या लेकरांचा माय अन बाप बनून कुटुंबाचा आधार बनला आहे. कुणी दिव्यांग आहे म्हणून तर कुणी अनौरस जन्माला आले म्हणून कचरा कुंडीत, रेल्वे फलाटावर, नदी काठावर तर कुणी संडासात निर्दयीपणे टाकून दिलेली ही लेकरं शंकरबाबांनी हृदयस्थ केली. माया, प्रेम, ममतेने त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली, समाजाकडून आधार शिक्षण, आरोग्य सुविधा मिळवत ह्या लेकरांना पायावर उभं करत अनेकांची लग्न करून देत संसार उभे केले.

कर्मयोगी गाडगेबाबा यांचा वारसा चालवणारे शंकरबाबा, ओशो रजनीश यांच्या विचारधनाने प्रेरित होऊन तब्बल वीस वर्षापासून बेवारस, दिव्यांग लेकरांच्या जगण्याचा आधार बनलेले आहेत. सद्विचारी लोकांच्या योगदानातून बाबा हे सव्वाशे लेकरांचं कुटुंब आंनदात चालवत आहेत. बाबांचे कार्य पाहून जागतिक कीर्तीची अनेक व्यक्तिमत्व प्रभावीत झाली आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विदयापीठाने त्यांच्या आभाळ उंचीच्या समाजसेवेचा गौरव म्हणून त्यांना डी.लिट.मानद उपाधी देऊन सन्मानित केले आहे. समाजानेच दूर लोटलेल्या सव्वाशे लेकरांची नवी ओळख समाजाला करून देणारे शंकरबाबा भारतातील एकमेव व्यक्ती आहेत; ज्यांचे नाव आधारकार्ड वर बाप म्हणून छापले गेले आहे.

गांधारी ही जन्मत: दिव्यांग तिच्या पालकांनी पंढरपूरच्या गोदावरी तिरावर तिला टाकून दिले होते. बेवारस म्हणून पोलिसांनी तिला नवरंगी बालगृहात पालन पोषणासाठी ठेवले. सहा वर्षाची असतांना ती बाबांच्या स्व. अंबादासपंत वैदय मतिमंद बाल सुधारगृहात वझ्झरला आली. हीच चिमुकली आता गांधारी शंकरबाबा पापळकर ह्या नावाने व आपल्या सुमधुर आवाजाने गायिका म्हणून परिचित झाली आहे.  आतापर्यंत तिने संगीताच्या सात परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. आपल्या लेकरांमधील उपजत कौशल्याला आकार देण्यासाठी वाट्टेल ते कष्ट करत प्रत्येक लेकराला नवी ओळख शंकरबाबांनी मिळवून दिली आहे. गांधारी सारखीच कथा असणारी ही सव्वाशे लेकरं ज्यांचं मृतपाय जगणं शंकर बाबांनी जिवंत केले आहे.

वझ्झर येथील खडकाळ पंचवीस एकराच्या टेकडीवरच्या आश्रमात मानवी समाजाला सन्मार्ग, सत्कार्य, सचोटी नि सामाजिक जाणीवेची प्रेरणा देणाऱ्या महात्मा जोतिराव फुले यांच्यापासून भारतरत्न मदर टेरेसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा ह्यांच्या सारख्या शेकडो महामानवाच्या नावाचे मार्ग फलक तयार केल्याचे दिसून येतात. ह्या विभूतीच्या आयुष्याचा जीवनप्रवास सुद्धा असाच खाच खडग्याचा होता; तरी त्यांनी मानव कल्याणासाठी कष्ट करून मानवी जीवन समृद्ध करून नंदनवन फुलवले ह्याची प्रचिती येथील मार्गांवरून चालताना पावलोपावली होते. अनेक सेवाभावी संस्था, व्यक्ती ह्या मानवतेच्या यज्ञात शक्य तशी सेवेची आहुती टाकत असतात; परंतु माझ्या नंतर ह्या लेकरांचे कसे होणार ह्याची चिंता ऐंशी वर्षाच्या शंकरबाबांची झोप उडवत असते. शासन निर्णयानुसार बालसुधारगृहात दिव्यांग, अनाथ लेकरं प्रौढ झाल्यानंतर राहू शकत नाहीत. त्यांचे जीवन पुन्हा बेवारस होऊन जाते म्हणून शासनाने कायदा करून बालगृहातील लेकरांचे पुनर्वसन करून जिवंत असेपर्यंत संगोपन करण्याची तरतूद करावी यासाठी वझ्झर ते दिल्ली असा संघर्ष शंकरबाबा करीत आहेत. देशातील १८ वर्षावरील बेवारस आणि दिव्यांगांना मरेपर्यंत अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा झाला पाहिजे. ह्या लढाईला माझ्या शेवटच्या श्वासापूर्वी तरी यश यावे ही त्यांची कणव ऐकून मन गहिवरून जाते. अशा लेकरांच्या जगण्याला मी गेल्यानंतर कायदाच आधार ठरू शकतो. ही त्यांची आर्त हाक भारत सरकारने सुद्धा ऐकली आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळात १८ वर्षावरील देशातील अशा लेकरांना कायद्याचा आधार मिळाला तर त्यांचे जीवनही अमृतमय होऊ शकते.

शंकरबाबा फक्त अनाथ, दिव्यांग लेकरांचाच बाप नाही तर उजाड माळरानावर विविध प्रजातींची वृक्षवल्ली फुलवून तेथे येणाऱ्या पक्ष्यांचा किलबीलाट कानावर पडला की, लाखो सजीवांचा पालनहार असल्याची अनुभूती येते. विविध प्रजातीच्या हजारो वनस्पतींचे संगोपन ह्या माळरानावर आपल्या सव्वाशे लेकरांच्या सहकार्याने शंकर बाबांनी केले आहे. मनातले सर्व प्रश्न विचारा असं म्हणत सुरू झालेल्या ह्या महामानवा सोबतच्या गप्पा म्हणजे आयुष्याच्या शाळेतील जीवन शिक्षण ह्या विषयाची तासिकाच असते. डॉ. शंकरबाबा पापळकर ह्या मानवतेची मनामनात रुजूवात करणाऱ्या देवमाणसाला जो कोणी भेटेल त्याच्या आयुष्यात सामाजिक जाणीवेतून जगण्याची प्रेरणाज्योत नक्कीच पेटती राहते.

-- तुळशिदास खिरोडकार

9970276582



Thursday, September 8, 2022

डॉ. सुचिता पाटेकर यांची खंडाळा शाळेत भेट

   आदरणीय शिक्षणाधिकारी (माध्य ) डॉ. सुचिता पाटेकर  यांनी आज जिल्हा परिषद खंडाळा शाळेत भेट देऊन शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध शालेय सहशालेय उपक्रमांची माहिती जाणून घेतली. आदरणीय शिक्षणाधिकारी यांचा शाळेतील वावर सर्व विद्यार्थी व सहकारी शिक्षक यांना कायम स्मरणीय राहील असा होता.

1) इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांसोबत जॉली फोनिक इंग्रजी अध्यापन तंत्राबाबत संवाद साधला.

2) पाचवीच्या वर्गात सामाजिक शास्त्राची तासिका घेतली.

3) स्वच्छ सुंदर शालेय परिसर पाहून त्यांनी प्रसन्नता व्यक्त केली. स्वच्छ शाळा पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक केले.

 4) शाळेच्या ब्लॉगचे, विविध उपक्रम व शैक्षणिक प्रगतीचे अवलोकन केले.

5) परिसरातील आदिवासी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश  करून शिक्षण प्रवाहात कायम टिकवल्याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. 





       शिक्षणाधिकारी मॅडम यांचा इयत्ता पाचवीमध्ये तास 

                                 Click Here

Thursday, August 25, 2022

व्हाईट स्पेस

 दै. #अजिंक्य_भारत वृत्तपत्रात प्रकाशित लेख

धन्यवाद संपादक साहेब, Nilesh Pote, Shivaji Bhosale 

व्हाईट स्पेस

देशभक्तीची पेरणी

ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात देशभर साजरा झालेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पुन्हा एकदा देशभक्तीची ज्योत भारतीयांच्या मना मनात चेतवून गेल्याचे चित्र भारतभर दिसून आले. भारताचा स्वातंत्र्यलढा जगात सर्वश्रेष्ठ मानला जातो; त्याला कारणही तसेच आहे. आतापर्यंत भारतापासून अमेरिकेपर्यंत सर्वच देशांनी पारतंत्र्य भोगलेलं आहे. भारत अपवाद यासाठी ठरला की येथील स्वातंत्र्याचा लढा हा ९९ टक्के रक्तपाताशिवाय लढल्या गेला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या सत्य अहिंसेच्या तत्वावर ही स्वातंत्र्याची लढाई लढली गेली. ह्या तत्वामुळेच संपूर्ण भारतीयांच्या मनात देशभक्ती पेरली गेली आणि ही देशभक्तीच इंग्रजांची बलाढ्य सत्ता भारतामधून उलथवून टाकण्यास कारणीभूत ठरली.

असहकार चळवळ, मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, सविनय कायदेभंग चळवळ, भारत छोडो आंदोलन अशी अनेक आंदोलने गाव पातळीपर्यंत त्या काळात आजच्या सारखी प्रचंड प्रमाणात प्रसार माध्यमे नसतांना पोहोचली होती. ह्या आंदोलनांमध्ये प्रत्येक भारतीय आपला खारीचा वाटा उचलत होता. मी देशाचा, हा देश माझा ही भावनाच देश स्वतंत्र करण्यासाठी कारणीभूत ठरली होती. स्वातंत्र्योत्तर काळात व स्वातंत्र्यानंतर च्या दशकात जन्माला आलेल्या भारतीयांमध्ये ही देशभक्ती कायम होती. त्यानंतरच्या काळात स्वातंत्र्याचा उपभोग घेणाऱ्या भारतीयांमध्ये पाहिजे त्याप्रमाणात देशभक्तीची बीजे पेरण्यास उणीव राहिली. देशातील शासन प्रशासन व शिक्षण व्यवस्था मनामनात देशभक्ती कायम ठेवण्यात कमी पडल्याचेच त्यानंतरच्या काळात प्रकर्षाने दिसून आले.

राष्ट्रीय सण, उत्सव वा राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागाबद्दल भारतीयांच्या मनात असणारी उदासीनता प्रकर्षाने जाणवत होती. भारताचं स्वातंत्र्य ७५ वर्षाचं झालं. शासन-प्रशासन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गावागावात, घराघरात स्वातंत्र्याची महती घेऊन पोहोचलं. तिरंगा घरा घरा वर डौलाने फडकू लागला आणि पुन्हा एकदा देशभक्तीची ज्योत मनात गाव खेड्यात पेटवली गेली. देशभक्ती म्हणजे फक्त तिरंगा फडकवणे किंवा राष्ट्रगान गायन करणे नव्हे तर प्रत्येक भारतीयाने आपले कार्य सचोटीने देशासाठी करायला हवे.  कोणतेही देश विघातक, भ्रष्टाचारी कृत्य हे देशभक्तीची भावना लयाला नेत असते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने गावोगावी स्वच्छता झाली. स्वच्छतेचा हा मंत्र जरी प्रत्येक भारतीयांनी मनापासून पाळला तर देशाची वाटचाल प्रगतीकडे झाल्याशिवाय राहणार नाही. स्वच्छता आली म्हणजे आरोग्य आले आरोग्य आले म्हणजे सुदृढ भारत होईल. तसेच अनेक संस्था संघटनांनी वृक्षारोपण व संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. यामुळे नक्कीच देशाचा पर्यावरणीय असमतोल दूर केला जाऊ शकतो. ह्या छोट्या छोट्या कामांमधून आपण देशभक्ती प्रदर्शित करू शकतो. आपल्याला नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे करणे हे सुद्धा देशभक्तीचेच प्रतिक आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने का होईना देशभक्तीची भावना मनामनात, घराघरात चेतवल्या गेली हेही नसे थोडके. देशभक्तीची ही व्हाइटस्पेस  पुढची पंचवीस वर्षे स्वातंत्र्याच्या शतक महोत्सव येई पर्यंत तरी कायम मनामनात तेवत राहावी ही अपेक्षा प्रत्येक भारतीयांकडून करूया.

--- तुळशिदास खिरोडकार

9970276582



Friday, July 22, 2022

स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021 - 2022

 खंडाळा शाळेला अकोला जिल्हास्तरीय स्वच्छता विद्यालय पुरस्कार

भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा स्वच्छता विद्यालय पुरस्कार योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यातील स्वच्छता विषयक जाणीव जागृती तथा व्यवस्थापन करणाऱ्या शाळांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वच्छता विद्यालय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा या शाळेला स्वच्छताविषयक उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापनासाठी जिल्हास्तरीय तीन पुरस्कार जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यपालन अधिकारी सौरव कटियार, शिक्षणाधिकारी (माध्य ) डॉ. सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी (प्राथ )डॉ. वैशाली ठग यांच्या हस्ते.देऊन सन्मानित करण्यात आले.

खंडाळा शाळेचे मानांकन राज्यस्तरीय स्वच्छता विद्यालय पुरस्कारासाठी झाले असून अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्रशासनाची मराठी माध्यमाची राज्यस्तरीय मानांकन मिळालेली ही एकमेव शाळा आहे. विद्यार्थ्यांमध्ये  स्वच्छता विषयक जाणीव जागृती निर्माण करणे सोबतच पाणी व्यवस्थापन, याबाबत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव प्रशासनाच्या वतीने करण्यात आला, गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या केंद्रप्रमुख गजानन गायगोळ, मुख्याध्यापिका सौ शीला टेंभरे, अध्यापक श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे,  सुभाष कवठकार, तुळशीदास खिरोडकार, राजेंद्र दिवनाले,  सुरेखा हागे, गोपाल मोहे,, निखील गिऱ्हे यांच्या धडापडीचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.


     



Wednesday, July 13, 2022

शाळा प्रवेशोत्सव 2022 - 2023

 माझे शाळेतील पहिले पाऊल --- खंडाळा शाळेचा उपक्रम 


विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन शैक्षणिक सत्राची सुरुवात


खंडाळा


दोन वर्षांच्या प्रदीर्घ भीतीदायक कोरोना काळानंतर नव्या शैक्षणिक सत्राची सुरुवात विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद व शाळा खंडाळा येथे करण्यात आली.


शाळेत आयोजित स्वागत कार्यक्रमात माझे शाळेतील पहिले पाऊल उपक्रम अंतर्गत पहिल्या वर्गात दाखल विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले. हे संचयीका पत्रकात संग्रही ठेवून इयत्ता आठवी नंतर शाळा सोडतांना विद्यार्थ्यांना परत करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी पुस्तक पाटीचे पूजन करून आनंददायी जल्लोषपूर्ण वातावरणात प्रवेश दिंडी काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करत शाळेत प्रवेश देण्यात आला. गावातील चौकात पालक, प्रतिष्ठित नागरिक यांनी प्रवेश दिंडीचे पूजन करून स्वागत केले. विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके, खाऊ वाटप करून शैक्षणिक कार्याला प्रारंभ करण्यात आला.


प्रवेशोत्सव दिंडीत ग्रामपंचायत उपसरपंच सिंधूताई वानखडे, माजी सरपंच वृषाली देवळे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनकर धुळ, पोलीस पाटील डॉ.अरुण तायडे, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष गजानन वानखडे, सतीश देवळे, विशेष शिक्षक तुषार अढाऊ, पालक, विद्यार्थी मुख्याध्यापिका सौ. शीला टेंभरे, ओमप्रकाश निमकर्डे, श्रीकृष्ण वाकोडे, सुभाष कवटकार, तुळशिदास खिरोडकार, सुरेखा हागे, राजेंद्र दिवनाले, गोपाल मोहे, निखिल गिऱ्हे उपस्थित होते.



Saturday, May 14, 2022

राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळा पुणे

                🔸महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🔸

महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार सोहळा-2022

स्थळ - अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी पुणे

दिनांक - 15 मे 2022,  वार- रविवार

       ----------======---------======-----------

           🔸 कार्यक्रमाचे अध्यक्ष🔸

🔹विक्रम काळे साहेब (शिक्षक आमदार)

                🔸उद्घघाटक 🔸

🔹निशिगंधा वाड  ( प्रसिध्द सिनेअभिनेत्री )

               🔸प्रमुख पाहुणे🔸

🔹सूरज मांढरे साहेब ( शिक्षण आयुक्त)

🔹बाळाराम पाटील साहेब (शिक्षक आमदार )

🔹जयंत आसगावकर साहेब  ( शिक्षक आमदार )

🔹सुधीर तांबे साहेब ( पदवीधर आमदार )

आपण पुरस्कार सोहळा व पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित रहावे हि विनंती .

               🔹महाराष्ट्र शिक्षक पॅनल🔹




Friday, April 29, 2022

शाळापूर्व तयारी मेळावा - खंडाळा

 दाखलपात्र लेकरांना दिली ज्ञानाची दिक्षा


खंडाळा येथे शाळापूर्व तयारी मेळावा


खंडाळा


इयत्ता पहिलीमध्ये दाखलपात्र लेकरांना जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्रशाळा खंडाळा येथे ज्ञानाची दिक्षा देऊन शाळेत प्रवेश देण्यात आला. या निमित्ताने पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.

दाखल पात्र विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास

भाषा विकास, बौद्धिक विकास,  ह्या क्षमता तपासणी करून त्यांच्या सद्यस्थितीबद्दल नोंदी घेण्यात आल्या. मेळाव्याचे उदघाटन फीत कापून व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनकर धुळ यांनी केले. दोन महिन्याच्या उन्हाळी सुटीत पालक, शिक्षक व स्वयंसेवक यांच्या सहकार्याने पूर्ण करावयाच्या कृती पुस्तिका इयत्ता पहिलीत दाखल विद्यार्थ्यांना वितरित करून शाळा प्रवेश देण्यात आला. 

मेळावा व बालकांच्या शाळेत प्रथम आगमन दिनानिमित्त शाळेत सजावट करून सजवण्यात आले होते. बालक पालक मेळावा यशस्वीतेसाठी व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष नरेश पिलांत्रे, विद्या जाधव, मुख्याध्यापक शीला टेंभरे, अध्यापक श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, सुरेखा हागे, राजेंद्र दिवनाले, अंगणवाडी सेविका वैशाली तायडे, प्रतिभा गावंडे, निर्जला अवचार यांनी बालकांच्या क्षमता चाचणी घेण्यास पुढाकार घेतला. मेळाव्याचे ध्येय प्रास्ताविक अध्यापक तुळशिदास खिरोडकार, संचलन निखिल गिऱ्हे तर आभार गोपाल मोहे यांनी मानले.




Thursday, April 7, 2022

प्रा. अरुण तायडे यांना आचार्य पदवी घोषित

 *खंडाळा येथील प्रा. अरुण तायडे यांना आचार्य पदवी घोषित*

      तेल्हारा तालुक्यामधील खंडाळा गावचे पोलीस पाटील व सातपुडा कला - वाणिज्य महाविद्यालय हिवरखेड येथील प्रा. अरुण तायडे यांना नुकतीच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची पीएच. डी पदवी घोषित करण्यात आली. राज्यशास्त्रमध्ये सन 1990 ते 2014 या कालावधीतील 'पश्‍चिम विदर्भातील मतदारांच्या राजकीय जाणिवा व सहभागाचे चिकित्सक अध्ययन' या विषयावर आधारित शोधप्रबंध प्रा. अरुण तायडे यांनी सादर केला. 

           प्रा. अरुण तायडे यांना पीएच. डी पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार जिल्हा परिषद केंद्र शाळा खंडाळा येथे करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनकर धुळ व प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक शीला टेंभरे, श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, सुरेखा हागे, राजेंद्र दिवनाले व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रा. अरुण तायडे यांनी शालेय जीवनापासून ते पीएच. डी मिळेपर्यंतचा प्रवास कथन केला. सत्कार समारंभाचे प्रास्ताविक तुलसीदास खिरोडकार, संचालन गोपाल मोहे तर आभार निखिल गिऱ्हे यांनी मानले. प्रा. अरुण तायडे यांना पीएच. डी पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



Saturday, March 26, 2022

सैनिक संवाद

 #सैनिक_संवाद

   अवघे आयुष्य राष्ट्रार्थ जगणाऱ्या भारतीय सैन्य दलातील सैनिकांच्या जगण्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी,राष्ट्रप्रेम जागृत व्हावे या हेतूने भारतीय सैनिक नामदेव कोकाटे यांच्याशी काल आमच्या #खंडाळा शाळेतील इयत्ता 5 ते 8 च्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व्हिडीओ कॉलिंग वरून संवाद साधला. ह्या सैनिक संवाद कार्यक्रमाचे निमित्त होते इयत्ता सातवी हिंदी विषयातील #हरिवंशराय_बच्चन यांची #हम_चलते_सिना_तान_के ह्या कविता अध्यापनाचे.

  याप्रसंगी भारतीय सैन्य करत असलेल्या देशसेवेबद्दल सैनिक नामदेव कोकाटे भरभरून बोलले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्रथम प्राधान्य देऊन नियमित व्यायाम,कवायत करावी तसेच घर, गाव, शाळा स्वच्छ राहील यासाठी सदैव पुढाकार घेणं ही देशसेवा असल्याचे सांगितले. विजयी विश्व तिरंगा प्यारा हे देशभक्ती समूहगीत गायन करून भारतीय सैनिकांप्रती विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

 सैनिक संवाद कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती ह्या मूल्याची रुजवणूक करण्यात मोलाचा हातभार लागला. देशभक्तीच्या घोषणा देत जय हिंद म्हणत सर्वांनी सैनिक नामदेव कोकाटे व भारतीय सैन्यदलाच्या कार्याला नमन केले. सहकारी स्नेही अध्यापक श्रीकृष्ण वाकोडे, ओमप्रकाश निमकर्डे, राजेंद्र दिवनाले, गोपाल मोहे, निखिल गिऱ्हे, सौ. सुरेखा हागे यांनी स्वागतपर संवाद साधला. 

   चाळीस मिनिटे चाललेल्या सैनिक संवाद कार्यक्रमाने शाळेतील वातावरण देशभक्तीमय करता आले याचा मनःपूर्वक आनंद वाटतोय.


---तुळशिदास खिरोडकार

   9970276582



Thursday, March 10, 2022

शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण प्रशिक्षण

 खंडाळा येथे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण प्रशिक्षण संपन्न.

     तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा येथे 10 मार्च 2022 रोजी केंद्रस्तरीय शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण प्रशिक्षण घेण्यात आले. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

        शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक यांच्या समन्वयाने शालेय प्रगती साधता येते या हेतूने परिपूर्ण माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून देण्यात आली. यावेळी खंडाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनकर धुळ, झरी बाजारचे अध्यक्ष भिका तायडे, केंद्रप्रमुख गजानन गायगोळ, मुख्याध्यापक शीला टेंभरे, आशा सोळंके, शारिक अली तसेच खंडाळा केंद्रांतर्गत शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व मुख्याध्यापक, शिक्षक यांची उपस्थिती होती.सदर प्रशिक्षणासाठी केंद्रप्रमुख गजानन गायगोळ, सहायक अध्यापक तुलसीदास खिरोडकार, दीपक पोके, गोपाल मोहे यांनी सुलभक म्हणून काम पाहिले.



  🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆                            सन 2024 - 2025  * मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा 2 या स्पर्धेत जि.प.व.प्राथमिक मराठी...